Thursday, August 14, 2008

मराठी पाट्यांसाठी राजची २८ ऑगस्टची 'डेडलाइन'

' दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची माझी मुदत १४ ऑगस्टला संपतेय... पण मुंबई महापालिकेचे आयुक्त जयराज फाटक यांनी २८ ऑगस्टपर्यंत मुदत दिलेय... म्हणून मीही २८ ऑगस्टपर्यंत थांबणार आहे.... म्हणून आता उरलेल्या दिवसांत, पाट्या बदलणं महाग पडतं की दुकान महाग आहे, याचा विचार ज्याने-त्याने करावा ' , असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला.

मराठी माणसाने मान खाली घालता कामा नये. ' भय्यां ' ना निवेदनाची भाषा कळत नाही, त्यांना चेपलंच पाहिजे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

मनसेच्या वतीनं आज नेत्रदानाचे २५ हजार फॉर्म पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्याला हात घातला आणि परप्रांतियांना टार्गेट केलं.

महाराष्ट्रात प्रत्येक दुकानावर मराठी पाट्या लागल्या पाहिजेत, हा मुद्दा आपल्या स्वाभिमानाचा आहे. मी १४ जुलैला सगळ्यांना एक महिन्याची मुदत दिली होती. पण मुंबई महापालिकेनं २८ जुलैला तसा फतवा काढलाय. त्यांची मुदत संपेपर्यंत मी वाट पाहणार आहे, आणि नंतर जे पत्रात लिहिलंय तेच होईल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. पाट्या बदलणं महाग की दुकान जास्त महाग, हे प्रत्येकानं ठरवावं, असं सांगून आपल्या आंदोलनाची दिशाही त्यांनी स्पष्ट केली. निवेदनं देऊन, थंडपणे सांगून हे ऐकणार नाहीत. त्यांना काठ्यांचीच भाषा कळते, असंही त्यांनी सुनावलं.

महाराष्ट्र काय बापाचा माल आहे का ? ही आपली जमीन आहे. आपण, आपलं अस्तित्त्व, आपली जमीन याबद्दल प्रत्येकानं अभिमान बाळगला पाहिजे, असंही राज यांनी नमूद केलं. खाली मान घालून, हातावर हात घेऊन बसलेला माणूस मला आवडत नाही. अन्याय दिसेल तिथे लाथ मारा, पुढचं मी बघतो, असा आदेशही त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला. गाफील राहिलात तर पुन्हा पारतंत्र्यात जावं लागेल, असंही त्यांनी सूचित केलं.

शिक्षणसम्राटांवरही राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. हे सगळे माजले आहेत. यांच्या पाट्या पाटणा, लखनौमध्ये झळकतात, तिथे त्यांचे दलाल फिरतात आणि मराठी माणसाची वाट लावून हे श्रीमंत होतात, त्यांना अद्दल घडलीच पाहिजे, असा पवित्राही त्यांनी घेतला.