Tuesday, March 25, 2008

shiv jayanti

तुताऱ्यांचा निनाद... ढोल-ताशांचा गजर... मंगलमय सूरांची उधळण... छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार... फटाक्‍यांची आतषबाजी... फुलांचा वर्षाव... टाळ्यांचा कडकडाट... अशा वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे महानाट्य आज शिवतीर्थावर साकार झाले. ...
"शतकाच्या यज्ञातून उठली एक केसरी ज्वाला, दहा दिशांच्या हृदयामधूनी अरुणोदय झाला' या काव्यपंक्ती साक्षात उतराव्यात, असा दिमाखदार शिवराज्याभिषेक सोहळा आज शिवाजी पार्क मैदानावर झाला. निमित्त होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या "शिवजयंती उत्सवा'चे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कणखर वाणीतून शिवरायांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचा इतिहास उलगडत असताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. शिवाजी महाराजांचा जन्म, महाराजांचे बालपण, त्यांच्यावर घडलेले संस्कार आणि हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी घेतलेली शपथ हे सर्व प्रसंग शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या कथनातून उपस्थितांसमोर जणु काही चित्रबद्ध झाले. ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुमधुर गायनाची याला साथ लाभली. राज्याभिषेक सोहळा "याचि देही याचि डोळा' पाहण्यासाठी शिवाजी पार्कवर जनसागर लोटला होता. शिवाजी पार्कचा कोपरा न्‌ कोपरा हा रोमांचकारी इतिहास डोळ्यात साठविण्यासाठी जनसागराने फुलून गेला होता. राज्याभिषेक सोहळा साकार होताच तुफान, आकर्षक व सप्तरंगी फटाक्‍यांची आतषबाजी झाली. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी शिवाजी पार्कचा परिसर दणाणून गेला.

"शिवकल्याण राजा' व "शिवराज्याभिषेक सोहळा' याचे भव्य प्रमाणात आयोजन केले होते. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी साकारलेल्या प्रचंड सेटवर हा सोहळा झाला. शिवतीर्थावर उभारलेल्या भव्य २४० फुटांच्या रंगमंचाच्या मध्यभागी भवानी मातेची मूर्ती ठेवण्यात आली होती. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहासाचे दाखले देत राज्याभिषेक सोहळ्याचा इतिहास कथन केला.

हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती, असे शिवाजी महाराजांचे वाक्‍य सांगत आता तुमच्यात आणि आमच्यात अशी इच्छा निर्माण होईल त्याच दिवशी हिंदुस्तान जगभरात महासत्ता म्हणून उदयास येईल, अशी हिंदुत्वाची महती बाबासाहेबांनी उपस्थितांसमोर सांगितली.

हा भव्य सोहळा सर्वांना व्यवस्थित पाहता यावा यासाठी शिवाजी पार्कवर ठिकठिकाणी मोठमोठे स्क्रीन लावण्यात आले होते.
------------------------------------------------------
ज्यांना राग येतो तेच इतिहास निर्माण करतात
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे शिवचरित्र कथन करीत असताना त्यांनी शिवाजी महाराजांच्या काही आठवणी सांगितल्या. तेव्हाचे मराठे आणि आताचे मराठे यांची काहीअंशी तुलना करीत ज्यांना राग येतो तेच इतिहास निर्माण करतात, असा संदेश देत "मनसे'चे मराठी आंदोलन योग्यच असल्याची पावती अप्रत्यक्षरीत्या त्यांनी दिली.
------------------------------------------------------
जयदेव ठाकरे यांची उपस्थिती
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेला शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी जयदेव ठाकरे आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे अनेक मान्यवरांच्या व पत्रकारांच्या भुवया उंचावल्या. पत्रकारांनी त्यांना गाठले असता ते म्हणाले, राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे माझ्यासाठी सारखेच आहेत. त्यामुळे हा भव्य सोहळा पाहण्यासाठी मी उपस्थित राहिलो.
------------------------------------------------------
- शिवराज्याभिषेक सोहळ्याला जनसागर लोटला
- अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे पास असलेले शेकडो जण रांगेत उभे
- उपस्थितांना बसण्यासाठी जागा अपुरी पडल्याने अडथळे काढून व्यवस्था करण्यात आली
- पत्रकारांच्या कक्षातही रसिकांची गर्दी
- "वेडात मराठे वीर दौडले सात' या गीतावर मनसेचे झेंडे हातात घेऊन काही मनसे कार्यकर्ते उपस्थितांमध्ये धावू लागले आणि त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले
- शिवराज्याभिषेक सोहळा होताच मैदानाच्या सर्व बाजूंनी आणि मुख्य व्यासपीठाशेजारी फटाक्‍यांची आतषबाजी

No comments: