Monday, September 15, 2008

११ जुलैनंतर काय

११ जुलैनंतर काय होतंय बघा!- राज
मुंबई,
मटा ऑनलाइन वृत्त

‘ आज मी शांत आहे, असं अनेकांना वाटत असेल... पण ही वादळापूर्वीची शांतता आहे... ११ जुलैनंतर काय होतंय बघा... ’ असा गर्भित इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबईत बोरिवलीला आयोजित एका कार्यक्रमासाठी राज ठाकरे उपस्थित होते, तेव्हा त्यांचं फक्त आठ मिनिटांचं भाषण झालं. पण त्यातून त्यांनी पुढच्या राड्याचेच संकेत दिले आहेत.

राज यांनी अपेक्षेप्रमाणे मराठीचा मुद्दा उचलला. उत्तर भारतीयांची खुमखुमी अजून गेलेली नाही. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. राज ठाकरे शांत झाला, नुसतं बोलून काय होणार, कृती केली पाहिजे, असं अनेकजण बोलत आहेत. पण ही वादळापूर्वीची शांतता आहे. ११ जुलैनंतर बरंच काही होणार आहे, त्यामुळे तोपर्यंत वाट पाहा, असं त्यांनी सूचित केलं.

असाच इशारा राज ठाकरेंनी ३ मेच्या शिवाजी पार्कच्या सभेपूर्वी दिला होता. त्या सभेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्यामुळे आता ११ जुलैनंतर राज काय करणार, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

मुखपत्र काढायचंय !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मुखपत्र काढण्याचा विचारही राज यांनी यावेळी बोलून दाखवला. मुखपत्र काढायची तयारी सुरू केल्याचंही त्यांनी बोलता बोलता सांगितलं. मुखपत्राच्या माध्यमातून रोजच्या रोज कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणं शक्य होईल, असा त्यांचा विचार आहे.

1 comment:

Unknown said...
This comment has been removed by a blog administrator.