Saturday, September 20, 2008

बच्चन कुटुंबियांविरुद्ध राज'बंदी' मागे

जया बच्चन यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेले वादळ क्षमवण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी मागितलेल्या जाहीर माफीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बच्चन कुटुंबियांविरुद्धचे आंदोलन मागे घेतले आहे.

जया बच्चन यांनी आपल्या वक्तव्यावर स्वतः माफी मागणे आवश्यक होते. मात्र, कुटुंब प्रमुख म्हणून अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची माफी मागितली. याचा आम्ही आदर करतो आणि बच्चन कुटुंबियाविरुद्धचे आंदोलन मनसेने मागे घेत आहेत, असे राज ठाकरे यांनी मनसेचे मुख्यालय असलेल्या राजगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले.

भाषणबंदीनंतरही राज ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांच्या माफीवर भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या संदर्भात भूमिका मांडण्यासाठी त्यांनी मुंबई पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्याकडे पत्रकार परिषदेची परवानगी मागितली होती. मात्र, चौकशीनंतर परवानगी देण्यात येईल असे सांगितले. त्यानुसार राज ठाकरे यांनी शिवाजीपार्क स्टेशनमध्ये अर्ज करून पत्रकार परिषदेची मागणी केली होती.

अमिताभ बच्चन यांनी मागितलेली माफी ही मराठी माणसाच्या एकजूटीचा विजय आहे. मराठी माणूस एकत्र आल्यावर काय करू शकतो याचं हे छोटंसं उदाहरण आता जगासमोर आहे. अमिताभ बच्चन हे ज्येष्ठ कलाकार आहे. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना सीमा नाहीत. यांनी आपल्या राज्यांच्या सीमेत बांधून घेवू नये, असा आग्रहही राज ठाकरे यांनी यावेळी केला.

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगवर जाहीर माफी मागितल्यानंतरही मनसेच्या कार्यकर्त्यांनी जूहूचे पीव्हीआर सिनेमागृह तोडले असे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ब्लॉग नावाची गोष्ट म्हणजे वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनल नाही. सकाळी उठल्यावर माणूस अमिताभ यांचा ब्लॉग वाचणार असे होत नाही. अमिताभ बच्चन यांनी काल सायंकाळी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सर्व गोष्टी क्लीअर झाल्या. त्यामुळे आता मनसेने सुरू केलेले आंदोलन आम्ही मागे घेत आहोत. कार्यकर्त्यांना शांतता राखावी असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

No comments: