Monday, September 15, 2008

पुण्याच्या एमआयटी कॉलेजमध्ये मनसेचा राडा

परप्रांतीय विद्यार्थांच्या मुद्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या पौड रोडवर असलेल्या एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये राडा केला आहे. स्थानिक मराठी विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक प्रवेश नाकारला जात असल्यामुळे हा पर्याय वापरावा लागला असे मनसेचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र सरकारने स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देताना प्राधान्य द्या असे सांगितले असतानाही एमआयटी स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देणे टाळते. यासंदर्भात वारंवर निवेदने देऊनही एमआयटीचे प्रशासन त्याकडे लक्ष देत नव्हते. असा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांना एमआयटीच्या आवारात दगडफेक केली. तसेच संस्थेचे संचालक मंगेश कराड यांच्या केबिनमध्ये घुसून तिथेही बरीच तोडफोड करण्यात आली.

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या सभेमध्ये परंप्रातीय विद्यार्थ्यांचा मुद्दा उचलून धरला होता. स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देताना डावलल्यास कॉलेज व्यवस्थापनाला त्याचे परिणाम भोगावे लागतील , असा इशाराही त्यांनी त्यावेळी दिला होता. तरीही एमआयटी कॉलेज मोठ्या प्रमाणावर राज्याबाहेरुन आलेल्यांना प्रवेश देत होते. असे मनसेच्या नेत्यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

या प्रवेश प्रकाराबाबत मनसेने कॉलेज व्यवस्थापनाकडे माहिती मागितली होती. तसेच राज्याबाहेरच्या मुलांना प्रवेश देणे थांबवावे अशी निवेदनही दिली होती. मात्र त्याकडे कॉलेज व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले म्हणून अखेर कॉलेज प्रशाननाला जाग आणण्यासाठी हा मार्ग निवडावा लागला , एमआयटीचे व्यवस्थापन पैसे घेऊन परप्रांतातील मुलांना प्रवेश देते आणि राज्यातील लायक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत आहे , असा आरोपही मनसेने केला आहे.

No comments: